Wednesday, November 12, 2008

रोझा पार्क ते बराक ओबामा आणि भारत


रोझा पार्क बसल्या म्हणून मार्टीन लुथर किंग ज्यूनिअर चालू लागले, मार्टीन चालले म्हणून ओबामा धावले आणि ओबामा धावले म्हणून पुढची पीढी आता आकाशात भरारी घेईल. (बसमधून प्रवास करतांना अमेरिकेत कृष्णवर्णीयांना गौरवर्णीयांच्या जागेवर बसून प्रवास करण्यास मनाई होती. मात्र रोझा पार्क या महिलेनं आपल्या जागेवरून उठण्यास नकार दिल्यानं अमेरिकेत पन्नासच्या दशकात वंशवादाच्या विरोधात एक ठिणगी पडली. याच ठिणगीतून जॉन एफ केनेडी, त्यांचे छोटे बंधू आणि मार्टीन ल्यूथर किंग यांनी क्रांतीचा वणवा पेटवला. ) ही आहे गेल्या पन्नास वर्षातली मानवाच्या आणि मानवतेच्या सन्मानार्थ अमेरिकेन जनतेने केलेली वैचारीक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची वाटचाल आणि भविष्यातले आणखी एक क्रांतीकारी परिवर्तनाचे पाहीलेले स्वप्न देखील. सध्या अमेरिकेन जनता याच विचारात गुंतली आहे. आणि बराक हुसेन ओबामा यांना देशाच्या अध्यक्षपदावर बसवून अमेरिकेच्या जनतेने हा विचार वास्तवात रुजवलाय. तसेच जात, धर्म, वंश आणि वर्णाच्या भिंतींमध्ये दुंभगलेल्या राष्ट्रांसाठी एक नवा आदर्शदेखील निर्माण केला आहे. मात्र एक भारतीय म्हणून अमेरिकेच्या वर्तमान आणि इतिहासाकडे पाहिले तर अमेरिकेची भारताशी तुलाना करण्याचा हव्यास टाळता येत नाही. अमेरिकेला तिनशे वर्षांचा इतिहास आहे. तर भारताला दोन हजारांपेक्षा जास्त वर्षांचा. मात्र भारताला मानवतेस काळीमा फासणा-या वर्ण व्यवस्थेला बळी पडलेल्या शोषितांचा ह्रदयद्रावक भूतकाळ आहे, तर अमेरिकेलाही वंश व्यवस्थेला बळी पडलेल्या माणसाला आणि माणुसकीला गुलामगिरीच्या साखळदंडात जोखडल्याच्या काळ्या आठवणी चिकटल्या आहेत. सध्या मात्र दोन्ही राष्ट्र लोकशाहीची मुल्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना दिसतात. अमेरिका हे जगातील सर्वात ज्येष्ठ लोकशाही राष्ट्र आहे, तर भारत हे सर्वात मोठं. मात्र लोकशाहीच्या माध्यमातून अमेरिकन जनतेला देशाचे नेतृत्व स्विकारण्यासाठी जी प्रगल्भता अडीचशे वर्षात आली ती भारताला फक्त पाच दशकात लाभली. मात्र याचा अर्थ असा नाही की भारताची जनता सर्वाथानं परिपक्व आणि जागरूक आहे. उलट बराक ओबामा यांच्या विजयामुळं भारताच्या जनतेकडून आता अपेक्षा उंचावल्या आहेत. कारण ओबामा यांना अमेरिकन जनतेनं नुसते कृष्ण वर्णीय म्हणून स्विकारले नाही, तर अमेरिकेन जनतेला 21 व्या शतकातील नव्या युगात एका नव्या दमाच्या तरूण नेतृत्वाची गरज होती. जी त्यांनी प्रखर राष्ट्रवाद जपणा-या आणि देशासाठी प्रसंगी प्राण त्यागण्याची तयारी ठेवणा-या सत्तर वर्षीय जॉन मॅकेन यांचा पराभव करून व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतीयांनी ओबामांचा विजय हा फक्त जात, धर्म आणि वंश परिवर्तनाच्या चौकटीत पाहू नये. ओबामांचा विजय म्हणजे अमेरिकन जनतेने नव्या पीढीवर दाखवलेले एक विश्वासाचे प्रतिक आहे. त्यामुळे नव्या युगातील भारताला आता गरज आहे ती अशाच नव्या उमेदीच्या तरूण नेतृत्वाची आणि भारतीयांना त्यावर विश्वास दाखवण्याची.