Thursday, December 4, 2008

मुंबईच का?

मुंबईच का? दहशतवादी मुंबईलाच पुन्हा पुन्हा का लक्ष्यं करतात याचं साध आणि सोपं उत्तर जे सर्वांना माहित आहे आणि ते म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन पाहिले तर मुंबईवर हल्ला केला म्हणजे सारा देश सैरा वैरा धावत सुटतो. कारण या मुंबापुरीत देशाच्या सर्वच दिशांमधून, सर्वच बाजूंनी आणि अनेक काना कोप-यांतून मोठ्या उद्योगपतीपासून ते छोटाशा पॉलिथीन गोळा करणा-यापर्यंत सर्वच आसरा शोधत येतात. यापुढेही येणार. मुंबईमध्ये दहशवाद्यांनी बॉमबस्फोट घडवला, गोळीबार केला किंवा 26/11 सारखं हत्याकांड केलं तर त्याचे पडसाद सर्वच राज्यांच्या राजधानीतच नव्हे तर बिहार, उत्तर प्रदेशसकट सर्वच राज्यातील छोट्या गावांमध्येही उमटतात. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी देशाभरातील प्रत्येक खेड्यातून एक तरी व्यक्ती मुंबईच्या कुशीत उब मिळवायला आली आहे. असं म्हणतात की मुंबईत माणूस सकाळी उपाशीपोटी उठू शकतो मात्र तो कधीच उपाशी पोटी झोपत नाही. आणि हेच नेमकं दहशतवाद्यांनी हेरलय. देशभरातील विविध भागांमध्ये वेगवेगळे बॉम्बस्फोट घडवून वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा मेंदूवरच वार करून सा-या शरीरामध्येच वेदनांचा प्रलय निर्माण करण्याचा राजमार्गच जणू दहशतवाद्यांना सापडलाय. एखाद्या राजाचा जीव पोपटात असल्यानंतर त्या राजाला मारण्यासाठी युद्ध छेडण्याची गरज नसते, तर त्या पोपटाची मान मुरगळणे पुरेसे असते, त्याप्रमाणेच भारताचं मुंबईच्या बाबतीत झालय. मुंबईवर वार केला की सा-या देशालाच जखमा होतात. त्यामुळे मुंबई हे दहशतवाद्यांचे साधे आणि सोपे लक्ष्यं बनलय. मुंबईवर हल्ला झाला की खेड्यापाड्यातील आईवडील आपल्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या सुरक्षेच्या चिंतेच्या आगीने होरपळून निघतात. काळजीनं व्याकूळ होतात. यालाच दहशतवाद म्हणतात. देशभरात काळजी आणि भीती पसरवण्याचे दहशतवाद्यांना मुंबई नावाचे साधे आणि सोपे साधन मिळाले आहे. आणि याच साधनांचा ते वारंवार वापर करतात. याची सरकारलाही पुर्ण जाणीव आहे मात्र मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. दहशवादी हल्ल्यांच्या मुद्याने आता संपुर्ण देशाला वेठीस धरलय. तर मुंबईकर जसा काही निखा-यांवर चालत आहे. 26/11च्या हल्ल्यांना आठवडा उलटल्यानंतरही दहशतवाद्यांनी पेरलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिसांना जीवाचं रान करावे लागत आहे. त्यामुळं दहशतवादी नसले तरी मुंबईवर त्यांची दहशत कायम आहे.

No comments: