Wednesday, October 15, 2008

भांडवलवाद कोसळला रे......


कॅपिटॅलिझम, कॅपिटॅलिझम आणि कॅपिटॅलिझम या शब्दाला खरी चकाकी लाभली ती पंधरा वर्षापुर्वी सुरू झालेल्या ग्लोबलायझेशनमुळे. या इझमचे सगळ्यांनाच आकर्षण होते. सगळ्या तरूणाईची हौस आणि मौज या शब्दानं गेल्या दशकभर पुरवली. मात्र लेहमन बदर्स, मेरी लिन्च, मॉर्गन बदर्स आणि एआयजीच्या रुपानं अमेरिकेने रुजवलेला आणि मोठा केलेला भांडवलवाद एका झटक्यात कोसळला. आणि या भांडवलवादाच्या नशेत डुबलेल्या भल्याभल्यांची झोप उडाली. रोजगार देण्याच्या नावाखाली मोठ मोठ्या आऊट सोर्सिंगच्या कंपन्या भारतासारख्या विकसनशिल आणि गरीब राष्ट्रांमध्ये आल्या. पदवी पुर्ण होण्याआधीच गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या तरूणांना मिळू लागल्या. लहान वयात पैशाचं आकर्षण जळू लागलं आणि शिक्षण अर्धवट सोडून एकवीसाव्या शतकातली नवी पिढी खुल्या दिलानं ही रातराणीची नोकरी आरामदायी प्रवासासारखी करू लागली. त्यामुळं उच्च शिक्षणाला आळा बसला. कोण शिकणार? उच्च शिक्षण घेतल्यानंतर येवढाच पगार मिळणार असेल तर शॉर्ट कट सोडून येवढ्या लांब लच्चक प्रवासाची गरजच काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र यामागे एक भयानक समांतर अर्थ व्यवस्था काम कतर असल्याचं भल्या भल्यांना लक्षात आलं नाही. या भांडवलवादी राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांमध्ये रोजगार निर्माण केला खरा, मात्र यांनी दिलेला पैसा यांच्याचसाठी खर्च करण्याचे ठिकाणही यांनी आपल्याच देशात निर्माण केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बडे बडे मॉल्स गल्लो गल्ली उभे राहु लागले. आणि या मॉल्समध्ये वेळे आधी आणि प्रमाणापेक्षा जास्त पैसा कमावणारे कॉल्स सेंटर आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे सॅम(समाधान), सँडी(संदिप), अँडी(अनिरूद्ध) हे वारेमाप खर्च करू लागले. म्हणजे एका हातानं यांनी आपला खिसा भरायचा आणि दुस-या हातानं तो रिकामा करायचा. म्हणजे काय अमेरिकेतून आलेला पैसा मायदेशीच परत जाणार. यांची अर्थव्यवस्था सशक्त आणि खेळती राहण्यासाठी यांनी फक्त आपला वापर करायचा. आपल्याला नको त्या सवयी लावायच्या. नको ते स्वप्न दाखवायचे. मात्र यांनी आर्थिक धोरणात काही चुकीचे बदल केले तर त्याचा फटका सा-या जगाला सोसावा लागतो. मग रिसेशनच्या नावाखाली आऊट सोर्स केलेल्या कंपन्या बंद करायच्या. म्हणजे शेवटी बळी आमचाच द्यायचा. आणि यांनी आपल्या जीवावर कमवलेली माया मात्र यांच्या देशातील संकटात सापडलेल्या कंपन्या आणि रोजगार तारण्यासाठी वापरायची. असं हे अमेरिकन भांडवलवादी धोरण. या धोरणानं आता भारताची अर्थव्यवस्थाही पोखरायला सुरवात केली आहे. हे सत्य स्विकारायला सरकार कितीही आढेवेढे देत असले तरी भविष्यात याचा भोगावा लागणारा परिणाम म्हणजेच याचे उत्तर आणि प्रश्नही असेल. दिड दशकाच्या अत्यल्प काळात या वादाने सा-या जगात नवे वादळासारखे थैमान घातले आहे. त्यामुळे चकचकीत आणि झगमगीत दिसणा-या या अमेरिकन भांडवलवादाचा नव्याने पुनर्विचार होणे गरजेचे आहे.

2 comments:

Onkar Danke said...

सुंदर लेख..ब-याच मोठ्या विषयाला थेट शब्दात वाचा फोडली आहे.
बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये हे सारे परिणाम आपल्या देशात जाणवराचं...हे परिणाम होऊ नये म्हणून भक्कम मध्यवर्ती व्यवस्था निर्माण होणं आवश्यक आहे.त्याचा धडा वर्तमान राज्यकर्ते या 'जेट'प्रकरनंतर तरी घेतील अशी आशा बाळगू या
ओंकार

Unknown said...

प्रयत्न चांगलाय, आताशा भांडवलवादाविरूद्ध लिहिण्याची ईस्टाईलच आलीय. पण हा लेख प्राथमिक अर्थाने तरी त्यातला वाटत नाही.

लेख चांगलाय, पण काय सांगायचंय ते कळलं नाही, प्रत्यक्ष भेटीत बोलूया
बाकी ठीक

एकच सुधारणा, बिग बाजारसारखे मॉल, मला वाटतं
बिग बाझार हे विदेशी नाही, जाणकारांना जास्त माहिती असेल, किशोर बियानी या भारतीय उद्योपतीचं ते दुकान आहे, त्यांचा ग्रुप फ्यूचर ग्रुप
सेंट्रल, पॅन्टालून, बिग बाझार ही सर्व त्यांचीच दुकाने वेगवेगळ्या सोसायट्यासाठी आहेत, त्यांच्या दुकानात काही FDI आहे की नाही ते नेमकं माहित नाही

भांडवलवाद कसा काय कोसळेत, अशी मंदी ठराविक काही काळानंतरच येत असते की, मार्क्सवादावर आधारलेली काही देशातली शासन व्यवस्था कोसळली की मार्क्सवाद संपला असं म्हणता येईल का, मार्क्सवाद अजून आहेच, की तो कसा संपेल, तसंच भांडवलवादाचंही आहे तो कसा कोसळेल किंवा संपेल, काही देशातल्या काही बँका म्हणजे भांडवलवाद नाही ना
नेपाळमध्ये असलेलं जगातलं एकमेव हिंदू राजवट संपुष्टात आली म्हणून हिंदुत्ववाद संपला का, तालिबान्यांच्या पाडावानंतर मुस्लीमांमधला कट्टरपंथ संपला का
असं कधी काही संपणार नाही, थोडीशी पिछेहाट होईल, पुन्हा पूर्ववत होईल