Saturday, October 18, 2008

काव्यगत न्यायातून रशियाने बोध घ्यावा


एकेकाळी सोव्हीएत रशियाचा अविभाज्य घटक असणा-या जॉर्जियाच्याच विरोधात रशियाचं धोरण कधी नव्हे ते इतके आक्रमक झाले. त्यासाठी रशियानं सा-या युरोप खंडाच्या विरोधातच शड्डू ठोकले आहेत. रशियाच्या उद्दामपणाच्या वागण्याला जबाबदार आहे तो त्यांच्या 'नॉस्टेलजिया'. नेमाडेंच्या भाषेत म्हणायचे झाले तर हा एक रोग आहे. आणि तो आता रशियाला जडलेला आहे. या रोगाचा इतिहासाशी फार जवळचा संबंध आहे. जगाच्या एक तृतियांश भुभागावर आपलं अधिराज्य गाजवणा-या सोव्हीएत रशियाची शकलं झाली ती तात्कालीन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या कार्किर्दीत म्हणजे 1991 मध्ये. आणि गोर्बाचेव्ह यांनाचं या महाकाय देशाच्या विभाजनाला जबाबदार धरण्यात आले. त्यांच्या कचखाऊ धोरणामुळेच सोव्हीएत संघ लयास गेल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेलेत. मात्र त्यांची राजकीय प्रगल्भता आणि त्यांच्या शांतताप्रिय धोरणामुळं सोव्हीएत रशियाच्या इतिहासात एक सोनेरी पर्व लिहीले गेले. ते म्हणजे 'ब्लडलेस रिव्हॉल्युशन'. या एका अवाढव्य राष्ट्राने पंधरा नवीन राष्ट्रांना जन्म दिला. मात्र सोव्हीएत संघाच्या एकाही नागरिकाला आपल्या प्रांताच्या सार्वभौमत्वासाठी रक्ताचा एकही थेंब सांडावा लागला नाही. कदाचीत जगाच्या इतिहासातली ही एकमेव घटना होती, अजूनही आहे आणि सार्वभौमत्वाच्या तसेच स्वातंत्र्याच्या मुद्यावर तिचा विक्रम मोडणे कोणत्याही राष्ट्राला शक्य नाही. शिस्तप्रिय साम्य़वादी विचारांच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकारांचे हनन करणा-या या राजवटीचा अंत झाला. येवढेच नव्हे तर या साम्यवादी व्यवस्थेवर पुर्णपणे नियंत्रण ठेवणा-या सोव्हीएतच्या केजीबी या गुप्तचर संस्थेच्या तात्कालिन प्रमुखांचा मास्कोच्या चौकातला भला मोठा पुतळा जनतेच्या उस्फुर्त पुढाकाराने खाली खेचण्यात आला होता. मात्र याच साम्यवादावर टीकेची झोळ उठवून तिचे खरे स्वरूप जगासमोर मांडणा-या अलेक्झांडर सोल्झेनेत्सीन यांना आपल्या मायदेशात सन्मानाची वागणूक देणारे आणि त्यांचा गौरव करणारे तात्कालीन अध्यक्ष पुतिन हे या ऐतिहासीक दिनाची दशकपुर्ती साजरा करण्याचे साधे कर्तव्य पार पाडू शकले नाहीत. याचाच अर्थ असा की गोर्बाचेव्ह यांचा अपवाद वगळता मानवाधिकार, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या पोथीनिष्ठ गप्पा झोडणा-या रशियाच्या कोणत्याही साम्यवादी नेत्यानं या क्रान्तीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले नाही. विचारांचा तेवढा उदारपणा त्यांच्याजवळ कधीच नव्हता. त्यामुळं त्यांना सोव्हीएत रशियाच्या ऐतिहासीक आठवणीत मश्गूल व्हायला आजही आवडते. मात्र वास्तवाचे भान आले की ते निराश होतात. आणि एकेकाळी आपल्या कुटुंबाचे सदस्य असलेल्यांना बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे रशियानं किरगिझस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताझिकिस्तान या राष्ट्रांशी सौजन्याचं आणि सौहार्दाचं धोरण अवलंबलं, तसेच इतर लहान भावांविषयी राबवलं असतं तर कदाचित रशियाची ज्येष्ठ बंधूची प्रतिमा निर्माण होऊन एक वेगळा दबदबा निर्माण झाला असता. तसेच नको तिथे नाक खुपसणा-या अमेरिकेलाही उत्तरपुर्व युरोपात थारा मिळाला नसता. मात्र रशियाचे या क्रांतिकडे नकारात्म दृष्टीने पाहणे आणि जॉर्जिया, लॅतव्हीया, युक्रेन, पोलंड, चेचेनिया यांच्याशी वारंवार संघर्षाची भुमीका घेऊन युद्धाची भाषा करणे रशियाच्या प्रतिमेला निश्चितच अशोभनीय आहे. आपण एकसंध राष्ट्र असतांना इतर प्रातांना स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी आढेवढे घेणा-या सोव्हीएत रशियाला आता अफखाजिया आणि ओसेशियाच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झाला. यापेक्षा मोठा दुटप्पीपणा होणे नाही. या दोन्ही प्रातांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली याच रशियानं जॉर्जियाच्या विरोधात युद्ध पुकारले. नको तेवढे हल्ले चढवले. मात्र सोव्हीएत संघ हा इतिहास आहे. आणि तो इतिहासच राहणार यात तिळमात्र शंका नाही. जर रशिया पुर्व आणि पश्चिम जर्मनीच्या पावलावर पाऊल ठेवून एकसंध होण्याचं स्वप्न पाहत असेल तर ते खोटे आत्मसमाधान असून तो निव्वळ एक भ्रम आहे. कारण दुस-या महायुद्धाचा सुड उगवण्यासाठी रशियानेच जर्मनीची फाळणी केली होती. जर्मनीच्या नागरिकांनी नव्हे. म्हणून जमर्नीच्या विलिनीकरणाची आणि रशियाच्या विभाजनाची प्रक्रिया एकाच वेळी व्हावी हा योगायोग नव्हे तर काव्यगत न्याय आहे. आणि या न्यायातूनच रशियानं बोध घेवून जॉर्जियावरचा अन्याय थांबवावा.

1 comment:

krishnat said...

mala tar loksatta madil ketkaranche article vaclyasarkhe vatai. tu tar print media made hava hotas. chan lihtos yaar. lage raho. all the best for ur blog.